मुंबई-ठाण्यादरम्यान नवी चित्रनगरी! ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई : गोरेगाव येथील चित्रनगरीप्रमाणेच मुंबई आणि ठाण्यादरम्यान नवी चित्रनगरी उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितले. महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि वासिम कुरेशी निर्मित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या नव्या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. गेले काही दिवस सातत्याने राज ठाकरे आणि आपल्यातील भेटीगाठी वाढत असल्याची कबुली देत गेल्या दहा वर्षांतील कसर आपण भरून काढत असल्याची मिश्कील टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
या वर्षभरात छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तृत्वगाथा सांगणारे अनेक मराठी ऐतिहासिकपट प्रेक्षकांनी अनुभवले आहेत. याच ऐतिहासिकपटांच्या लाटेतील ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या नव्या चित्रपटाची घोषणा एका भव्य समारंभात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते नारळ वाढवून पारंपरिक पद्धतीने चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उदय सामंत आणि प्रताप सरनाईकही कार्यक्रमाला उपस्थित होते.
एकाच व्यासपीठावर आलेल्या मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांनी यावेळी गेल्या काही महिन्यात घडलेल्या सत्तांतर नाटय़ापासून अनेक महत्वाच्या घडामोडींवर मिश्कील भाष्य करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. रणांगणात शौर्य गाजवणाऱ्या या सात मराठी वीरांप्रमाणेच आम्हीही साडेतीन महिन्यांपूर्वी एक मोठी दौड लगावली होती. त्या काळात आम्ही कुठून कुठे गेलो याची कल्पना नाही, मात्र जनतेच्या मनात जे होते तेच आम्ही केले. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असे सांगत पुन्हा भाजपबरोबर सत्तेत आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. राज ठाकरे कायमच मराठी कलाकारांच्या पाठीशी उभे असतात, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले.
अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत..
दर नवीन येणाऱ्या शिवकालीन चित्रपटाबरोबर विविध कलाकारांनी साकारलेले शिवाजी महाराज पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, सुबोध भावे, शरद केळकर यांनी आत्तापर्यंत शिवाजी महाराजांची भूमिका केल्या आहेत. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठमोळय़ा चित्रपटात हिंदीतील लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार पहिल्यांदाच शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयबरोबर सात महत्वाच्या योद्धयांच्या भूमिका प्रवीण तरडे, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर आणि ‘बिग बॉस’ फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम हे कलाकार साकारणार आहेत. तसेच अभिनेत्री शिवानी सुर्वे, दीपाली सय्यद, गौरी इंगळे यांच्याही प्रमुख भूमिका यात असणार आहेत.
You may like this blog too
Content Source: https://www.loksatta.com/mumbai/proposal-to-build-new-film-city-between-mumbai-thane-says-cm-eknath-shinde-zws-70-3231612/

Comments
Post a Comment